एस बी एम 2.0 प्रकल्पाच्या संथ कामावर उपमहापौरांची नाराजी
१२ महिन्यांची मुदत संपण्यास काहीच कालावधी शिल्लक, मात्र काम केवळ १०% — डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या कडक सूचना
जळगाव शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या SBM 2.0 प्रकल्पाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत आज उपमहापौरांनी संबंधित अधिकारी व प्रकल्प प्रतिनिधींची बैठक घेऊन आढावा घेतला.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट यांच्या SBM 2.0 प्रकल्पांतर्गत सदर काम महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारास दिलेले असले, तरी या कामावर देखरेख, नियंत्रण व कामाची प्रगती तपासण्याची महत्त्वाची जबाबदारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट यांच्या SBM 2.0 टीमची आहे.
या प्रकल्पासाठी १२ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आलेली असून येत्या नोव्हेंबर महिन्यात सदर मुदत संपणार आहे. मात्र, मुदत संपण्यास काहीच कालावधी शिल्लक असताना आजपर्यंत फक्त १०% काम पूर्ण झाले असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. त्यामुळे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, कामाच्या या संथ गतीबाबत उपमहापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचा प्रतिनिधी कायमस्वरूपी उपस्थित असणे आवश्यक
सदर प्रकल्पाच्या कामावर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट यांच्या SBM 2.0 कडून किमान एक प्रतिनिधी जळगाव येथे कायमस्वरूपी उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून संबंधित प्रतिनिधी नियमितपणे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे प्रत्यक्ष कामाची पाहणी, ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता व प्रगती तपासणे तसेच निर्माण होणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यामध्ये अडथळे निर्माण होत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली.
डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश
जळगाव शहरातील कचरा डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचे Segregation (वर्गीकरण) हा अत्यंत महत्त्वाचा विषय अद्याप प्रलंबित आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डास-माशांचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या आरोग्याचा फार मोठा गंभीर प्रश्न उपस्तिथ झाला आहे कॅन्सर चे तसेच स्किन आजार च प्रादुर्भाव वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत उपमहापौरांनी मनपा पर्यावरण अधीक्षक प्रकाश पाटील तसेच प्रकल्प प्रमुख मनपा इंजिनीयर योगेश वाणी तसेच मुकेश खोडके (वरिष्ठ प्रकल्प अधिकारी), सय्यद फरहाण (सिनिअर प्रोजेक्ट ऑफिसर) आणि वहिब शेख (ज्युनिअर प्रोजेक्ट ऑफिसर) यांना काम तातडीने गतिमान करण्याच्या कडक सूचना दिल्या.
“प्रकल्पाची १२ महिन्यांची मुदत संपत आली आहे आणि आजपर्यंत केवळ १०% काम झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ठेकेदाराला काम दिले असले तरी त्यावर प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प संस्थेची आहे. त्यामुळे आता केवळ कागदोपत्री पाठपुरावा न करता प्रत्यक्ष कामाला गती देणे आवश्यक आहे,” असे उपमहापौरांनी स्पष्ट केले.
तसेच येत्या काही दिवसांत डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने सुरू कराव्यात, कामासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी आणि प्रकल्पाची प्रत्यक्ष प्रगती नियमितपणे तपासावी, अशा सूचना देण्यात आल्या.
“नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही”
SBM 2.0 हा शहराच्या स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाचा प्रकल्प असून, त्यामध्ये होणारा विलंब नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारा आहे. त्यामुळे कामाच्या संथ गतीबाबत कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही.
उपमहापौरांनी संबंधितांना कामाची गती तातडीने वाढवून निर्धारित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून, पुढील काळात कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
“डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा केवळ प्रकल्पाचा विषय नसून जळगावकरांच्या आरोग्याशी निगडित प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न आता आणखी प्रलंबित ठेवला जाणार नाही.”
