रामदास कॉलनीत प्रस्तावित उद्यानाची महापौर, आयुक्तांकडून पाहणीपुढील ३ महिन्यात नागरिकांसाठी खुले होणार : महापौर दीपमाला काळे

शहरातील रामदास कॉलनी येथे निर्माणाधीन असलेल्या प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी शनिवारी महापौर दीपमाला काळे आणि महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत केली. हे उद्यान पुढील तीन महिन्यांत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्याच्या सूचना आयुक्त व महापौरांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. उद्यानाचे काम सध्या ६० टक्के पूर्ण झाले आहे.
पाहणीदरम्यान महापौर व आयुक्तांनी संपूर्ण कामाचा आढावा घेतला. या उद्यानात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची उत्तम सोय केली जात आहे. पाहणी प्रसंगी उपस्थित नगरसेवकांनी उद्यानात विहीर खोदण्याची मागणी केली तसेच सर्व कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
विद्युत विभागाच्या कामाची माहिती घेताना आयुक्त आदित्य जीवने यांनी उद्यानात पारंपरिक दिव्यांऐवजी सोलर (सौर) दिव्यांच्या वापरावर भर देण्याचे निर्देश दिले.या पाहणीदरम्यान नगरसेवक नितीन बरडे, गायत्री राणे, ॲड. शुचिता हाडा, अनिल अडकमोल यांच्यासह शहर अभियंता योगेश बोरोले, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, अभियंता आर. टी. पाटील, अमोल पाटील, पाणीपुरवठा विभाग प्रमुख घृष्णेश्वर साळुंखे, विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

