जळगाव, (प्रतिनिधी) : देशाचा उज्ज्वल राष्ट्र युवक आणि प्रगतिशील नागरिक घडवण्यासाठी समाजात वाचन संस्कृती रुजणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप जिल्हा कामगार आघाडीच्या वतीने रेमंड कॉलनी येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ मधील ६० विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार सुरेश भोळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी आणि उज्ज्वल राष्ट्राच्या निर्मितीसाठी युवा पिढीने थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांची पुस्तके वाचल्यास विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल. वाचन संस्कृतीमुळेच एक उत्तम विद्यार्थी आणि जबाबदार नागरिक घडतो.

हा उपक्रम आमदार सुरेश भोळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास माजी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सदस्या व नगरसेविका वंदना इंगळे, नगरसेविका रंजना वानखेडे, संयोजक पितांबर भावसार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष इंगळे, जिल्हा पदाधिकारी विजय वानखेडे, मनोज भांडारकर, माजी मंडळ अध्यक्ष सुनील सरोदे, कामगार आघाडी अध्यक्ष प्रशांत जाधव, तसेच हर्षल इंगळे, सुदर्शन चालसे, मनोज निंबाळकर, भारत पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि दिलीपशेठ चौधरी आदी उपस्थित होते.
तसेच शाळा क्र. ४५ च्या मुख्याध्यापिका अश्विनी अंबाड, उपशिक्षिका सविता पालवे व उपशिक्षिका ज्योती काकडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
