सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर आविष्कार: ‘चेतना व्यसनमुक्ती केंद्रा’तर्फे हमाल बांधवांना उन्हापासून बचावासाठी साहित्याचे वाटप
जळगाव: वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, समाजातील कष्टकरी घटकांप्रती संवेदनशीलता जपत जळगावच्या ‘चेतना व्यसनमुक्ती केंद्रा’ने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. रेल्वे मालधक्क्यावरील हमाल बांधवांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या, ओआरएस (ORS) पावडर आणि रुमालांचे वाटप करण्यात आले.
आज ३० एप्रिल रोजी भोईटे नगर परिसरातील रेल्वे मालधक्क्यावर हा कार्यक्रम पार पडला. रणरणत्या उन्हात दिवसभर शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, नगरसेविका सौ. रंजनाताई वानखेडे आणि भाजपा कोषाध्यक्ष श्री. विजय वानखेडे यांच्या शुभहस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले. “समाजासाठी काहीतरी देण्याची ही एक उत्तम संधी आहे. माणुसकीची उब आणि सेवाभावाची जाणीव जपणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे मत श्री. विजय वानखेडे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजक आणि चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीनभाऊ विसपुते यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे सदस्य, मित्र परिवार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्राच्या या छोट्याशा पण महत्त्वपूर्ण मदतीने कष्टकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले असून, शहरात या उपक्रमाची सकारात्मक चर्चा होत आहे

