मेहरूण तलावात गटारीचे पाणी जाणार नाही!

प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना; गणपती विसर्जनापूर्वी दोन पंपहाऊस सुरू करण्याचे आदेश
जळगाव शहराचे वैभव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या मेहरूण तलावात गटारीचे सांडपाणी जाणार नाही, यासाठी तातडीने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. मेहरूण तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरपणे घेत आज उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच प्रभाग १३ मधील नगरसेवक नितीनभाऊ सपके, नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक अमरकाका जैन व नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
मेहरूण तलावात शहरातील एक-दोन नव्हे तर तब्बल १६ ड्रेनेज लाईनचे सांडपाणी सोडले जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ही समस्या केवळ तात्पुरती न सोडवता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आगामी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दोन पंपहाऊस तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी संबंधित ठेकेदाराने तलावात गटारीचे पाणी जाऊ नये, यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची ब्ल्यू प्रिंट सादर करून संपूर्ण नियोजनाची माहिती दिली. सांडपाण्याचा प्रवाह अडविणे, आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे आणि तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांची माहिती बैठकीत देण्यात आली.
मेहरूण तलाव हा जळगाव शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे. त्यामुळे तलावात गटारीचे पाणी जाणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, सभापती व उपस्थित नगरसेवकांनी व्यक्त केली.
तलावात सांडपाणी जाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठेकेदाराने विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे स्पष्ट आदेश उपमहापौरांनी दिले. तसेच कामाची गुणवत्ता, नियोजनानुसार अंमलबजावणी आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होते की नाही, यावर महापालिका प्रशासनाने काटेकोर लक्ष ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या.
“मेहरूण तलावाचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्षात त्याचा परिणाम दिसला पाहिजे. गटारीचे पाणी तलावात जाणार नाही, याची ठोस व्यवस्था तातडीने झाली पाहिजे. याबाबत महापालिका आयुक्तांशीही चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल,” असे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी सांगितले.
मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखून हा तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
