आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगावात सामूहिक योगाभ्यास
जळगाव दि.21 (जिमाका) : भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा मानला जाणारा आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी मार्ग ठरलेला योग आज जागतिक स्तरावर स्वीकारला गेला असून, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगावात विविध स्तरांवर उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच ‘मेरा युवा भारत, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, मेरा युवा भारतचे युवा अधिकारी अभिषेक चवरे, गट शिक्षणाधिकारी (पाचोरा) विजय पवार, मनपा प्रशासनाधिकारी खलील शेख तसेच जिल्हा खोखो संघटनेचे शेखर पोळ आपल्या खेळाडूंसह, खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटरचे खेळाडू व प्रशिक्षक निलेश बाविस्कर, प्रगती शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. शिरसाट व विद्यार्थी, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व क्रीडा शिक्षक रंजीत पाटील तसेच इतर विद्यालयांचे खेळाडू व महिला क्रीडा शिक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, योग प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा योग प्रशिक्षक चंचल माळी यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक योगसाधना करण्यात आली. यावेळी त्यांनी योगाचे शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. योगाभ्यासानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून उपलब्ध क्रीडा सुविधा व सेवांचा आढावा घेतला. क्रीडा संकुलातील आवश्यक सुधारणा व प्रलंबित उणिवा तातडीने दूर करण्याबाबत त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून योगाबाबत जनजागृती होण्यासह निरोगी जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला