जळगाव महापालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार – रवींद्र चव्हाण

जळगावआगामी महापालिका निवडणुकीत जळगावमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असून शहरात महायुतीचाच झेंडा फडकणार, असा ठाम दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. जळगाव महापालिकेत महायुतीची सत्ता निश्चित असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगावला आले नाहीत तरी चालेल; त्यांनी राज्यातील इतर भागांच्या विकासासाठी वेळ द्यावा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
पिंप्राळा येथे 4 रोजी आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, आमदर मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, अमोल जावळे, नितीन लढा, विजय चौधरी, चंदू बाविस्कर, विष्णू भंगाळे, संजय पवार, केतकी पाटील, गोविंद अग्रवाल, रोहित निकम यांच्यासह आरपीआय (आठवले गट)चे भाजप पुरस्कृत उमेदवार अनिल अडकमोल, मनोज चौधरी, सरिता माळी, राजू सोनवणे आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले की, देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे. केंद्रात एनडीए आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने विकासकामे वेगाने सुरू आहेत. ‘विकसित भारत २०४७’ हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राची पावले पडत असून जळगावलाही विकसित करण्यासाठी महायुतीची सत्ता आवश्यक आहे पंतप्रधान मोदींच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या भूमिकेमुळे देशातील पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत. महायुतीचा विकासाचा पॅटर्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत बंडखोरांसोबत जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.