रचना कॉलनीत श्रीमद् भागवत कथेच्या सप्ताहातून भक्तांना मिळाला भक्तिभावाचा अमृतानुभव
जळगाव, दि.७ – जळगाव शहरातील रचना कॉलनी, कासमवाडी परिसरात दत्तजयंतीनिमित्त भाविकांचे आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा श्रीमद् भागवत कथेचा सात दिवसीय संगीतमय सप्ताह अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लीलाधर ओंकार नेमाडे यांच्या पुढाकाराने दि.३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. साकेगाव येथील हभप जितेंद्र पंडीत महाराज यांनी दररोज भक्तांना भागवत धर्म, भक्तीची शक्ती, श्रीकृष्णचरित्र, तसेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांची महती प्रभावी शब्दांत समजावून सांगितली.
दररोजच्या निरुपणात वामन अवतार, प्रह्लाद-हिरण्यकश्यपू कथा, गोपिकांचे प्रेमभक्ती, श्रीकृष्ण-उद्धव संवाद, सुदामाचरित्र असे विविध धार्मिक प्रसंगांचे देखावे सादर करण्यात आले. कथेच्या समाप्तीनंतर दररोज आरती व प्रसाद वितरण होत असल्याने परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण नांदत होते.
रविवार, दि.७ रोजी सप्ताहाचा सुंदर समारोप पार पडला. सकाळी हवन, काल्याचे कीर्तन, दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी कथेची दिंडी भक्तिमय घोषणांनी निघाली.
दिंडीने परिसर झाला मंत्रमुग्ध
संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी दिंडीचे आणि ग्रंथाचे रांगोळी काढून पूजन करण्यात आले. श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, मेहरुण यांच्या टाळ मृदंग, ढोलकीच्या गजरात अभंग सादर करण्यात आले. दिंडीत चिमुकल्या भक्तांनी पारंपारिक वेषात ठेका धरला होता. दिंडीने संपूर्ण रचना कॉलनी, कासमवाडी परिसर भक्तिभावाने मंत्रमुग्ध झाली.रचना कॉलनीत श्रीमद् भागवत कथेच्या सप्ताहातून भक्तांना मिळाला भक्तिभावाचा अमृतानुभव
