जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी व योगदान समजून घेणे महत्वाचे – रेडक्रॉस आयोजित अमृतसर येथील आपतग्रस्तांना मदत देणाऱ्या
संस्थां व मान्यवर सन्मान प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांचे मनोगत.
जळगाव – “एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ”
या उदात्त हेतूने अमृतसर पंजाब येथील आपतग्रस्तांचे विस्कळीत जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी रेडक्रॉसने केलेल्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देणाऱ्या संस्थांचा व मान्यवरांचा सन्मान सोहळा रेडक्रॉस येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी रेडक्रॉसमार्फत केलेल्या आवाहनाला आपण दिलेला प्रतिसाद हा कौतुकास्पद असून आपल्या सर्वांच्या दातृत्वाबद्दल रेडक्रॉस आपले मनस्वी करत आभार व्यक्त करते अशा शब्दांत कौतुक केले. रेडक्रॉस दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे चेअरमन श्री.अतुलभाऊ जैन यांनी सांगितले की, मा. जिल्हाधिकारी साहेबांनी रेडक्रॉसच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राची जबाबदारी ज्या विश्वासाने माझ्यावर सोपविली आहे, तो विश्वास सार्थ ठरविण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. उपाध्यक्ष श्री. गनी मेमन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अमृतसर पंजाब येथील आपतग्रस्तांना सर्व मदत साहित्य पोहोचविणारा महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आहे, यात आपल्या सर्व देणगीदात्यांचे मोलाचे योगदान आहे, हे अभिमामाने नमूद करावेसे वाटते. मदत साहित्य जमा करण्यापासून ते निश्चित ठिकाणी पोहोचण्यापर्यंत मा. जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले असून स्वतः उपस्थित राहून सर्व गोष्टींवर लक्ष घातले हे खूप मोलाचे आहे असे ही त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील यांनी देखील रेडक्रॉसचे पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी यांनी दाखविलेल्या तत्परतेसाठी सर्वांचे अभिनंदन केले.

मा.जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, रेडक्रॉस जळगावने एक दीर्घकालीन आणि महत्त्वाकांक्षी वाटचाल निश्चित केली आहे. त्यात प्रामुख्याने रेडक्रॉसच्या सर्व सभासदांना भविष्यातील सर्व नियोजित उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी करून घेत त्या माध्यामातून त्यांच्या वेळेचा, कौशल्याचा आणि क्षमतेचा योजनाबद्ध उपयोग करून घेणे; प्रत्येक तालुक्यामध्ये एक रक्तपेढीची उभारणी करत तेथील रुग्णांना चांगल्या दर्जाचा व योग्य सेवाशुल्कात रक्त पुरवठा करणे; एच.आय.व्ही./ एड्स, क्षयरोग व कुष्ठरोग प्रभावित भागात रेड क्रॉस मार्फत बाह्य रुग्ण विभाग सुरु करणे आणि गोवरमुक्त व ॲनिमियामुक्त संकल्पना राबविणे; दिव्यांगांच्या आवश्यक थेरेपी, सहाय्यक साधने, पालक/सहाय्यकांना मदत पूर्ण करत जळगाव दिव्यांग पुनर्वसन केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न करणे; अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांची वैद्यकीय काळजी घेत त्यांना मानसिक आधार देऊन आपलेपणाची जाणीव करून देण्याच्या सावली केअर सेंटर सारखा उपक्रम लवकरच रेडक्रॉस मार्फत सुरु करणे, इत्यादी नवीन उपक्रम सर्वांच्या योगदानाने राबवावयाचे आहे असे सांगितले.
माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते सर्व देणगीदाते व तत्पर सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रेडक्रॉसचे सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी व रेडक्रॉसचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
