श्री स्वामिनारायण मंदिर जळगाव येथे अडीच वर्षांपासून बाल संस्कार केंद्राचे यशस्वी आयोजन
जळगाव –धार्मिक संस्कार, नीतिमूल्ये आणि भारतीय परंपरेचे बीज लहान मुलांच्या मनामध्ये रोवण्यासाठी श्री स्वामिनारायण मंदिर, जळगाव येथे गेली अडीच वर्षांपासून बाल संस्कार केंद्र यशस्वीरित्या चालवले जात आहे. या केंद्राचा उद्देश म्हणजे बालकांमध्ये सद्गुणांची जडणघडण करून त्यांना उत्तम नागरिक आणि संस्कारित व्यक्तिमत्त्व म्हणून घडवणे.
केंद्रात 8 ते 25 वयोगटातील मुला–मुलींचा उत्स्फूर्त सहभाग आहे. प्रत्येक रविवारी सकाळी घेण्यात येणाऱ्या या वर्गांमध्ये श्लोक पठण, भजन, स्तोत्र, नैतिक गोष्टी, नाटिका, प्रश्नोत्तरे, योग व प्रार्थना अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांना श्रद्धा, प्रामाणिकपणा, सेवा, अनुशासन आणि देशप्रेम यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी साधू–संत तसेच सेवाभावी कार्यकर्ते मार्गदर्शन करतात.
गेल्या अडीच वर्षांत या उपक्रमामुळे शेकडो बालकांमध्ये लक्षणीय बदल दिसून आले आहेत. मुलांची प्रार्थनेत रुची वाढली आहे, आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे आणि पालकांनीदेखील त्यांच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल झाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. धार्मिकतेबरोबरच शैक्षणिक व सामाजिक जीवनातही मुलांना याचा लाभ होत आहे.
“बालक म्हणजे भविष्यातील समाजाचे शिल्पकार” या तत्त्वज्ञानावर आधारित हे केंद्र पुढील पिढीला योग्य संस्कार मिळवून देण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ ठरत आहे. मंदिर प्रशासन, साधू–संत आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या समन्वयातून चालणारा हा उपक्रम आज जळगाव शहरातील एक प्रेरणादायी प्रकल्प ठरला आहे.प्रत्येक रविवारी या बाल संस्कार केंद्राचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मंदिरात आणावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
शास्त्री नयनप्रकाशदासजी